शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील तंबाखू विक्रीविरोधात बारामती शहर पोलिसांची विशेष मोहीम; दोन विक्रेत्यांवर COTPA अंतर्गत कारवाई

विद्यार्थी व अल्पवयीन मुलांचे तंबाखूजन्य पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशांच्या अनुषंगाने बारामती शहर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवून दोन स्वतंत्र ठिकाणी कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, 2003 अर्थात COTPA च्या कलम 6(b) चे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर खटले दाखल करण्यात आले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बारामती शहरातील विविध भागांमध्ये फिरून शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांच्या आसपास असलेल्या पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी केली.

COTPA अधिनियमाचा मुख्य उद्देश सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे तसेच विशेषतः मुले, विद्यार्थी व युवक यांचा तंबाखूजन्य पदार्थांशी संपर्क आणि सहज उपलब्धता कमी करणे हा आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास निर्बंध आहेत, तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर निर्बंध आहेत, 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे आणि कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड त्रिज्येच्या परिसरात सिगारेट अथवा इतर तंबाखूजन्य पदार्थ विकणे, विक्रीसाठी देणे किंवा विक्री करण्यास परवानगी देणे कलम 6(b) नुसार प्रतिबंधित आहे. कलम 6 चे उल्लंघन केल्यास कलम 24 अन्वये दंडाची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या संबंधित नियमांनुसार 100 यार्डचे अंतर शैक्षणिक संस्थेच्या बाह्य सीमाभिंत किंवा कुंपणापासून त्रिज्यात्मक पद्धतीने मोजले जाते.

या विशेष मोहिमेदरम्यान दि. 02/09/2026 रोजी सायं. 06:10 वा.च्या सुमारास फातिमानगर, जगतापमळा, बारामती येथील मुस्कान टी हाऊस येथे तपासणी करण्यात आली. सदर दुकान कारभारी धोंडिबा आण्णा सातव शाळेच्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या परिसरात असताना तेथे सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवून त्यांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गनीभाई बाबुलाल शेख, वय 61 वर्षे, रा. फातिमानगर, जगतापमळा, बारामती यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे खटला रजि. नं. 07/2026, COTPA अधिनियम, 2003 चे कलम 6(b), शिक्षेसाठी कलम 24 अन्वये कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणाचे फिर्यादी पोलीस शिपाई संतोष हनुमंत वीरकर, ब.नं. 1217 आहेत.

त्यानंतर त्याच दिवशी सायं. 06:30 वा.च्या सुमारास खंडोबानगर, बारामती येथील अमोल पान शॉप येथे करण्यात आलेल्या तपासणीमध्येही शैक्षणिक संस्थेच्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या परिसरात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिल्पा अमोल भोसले, वय 35 वर्षे, रा. खंडोबानगर, बारामती यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे खटला रजि. नं. 08/2026, COTPA अधिनियम, 2003 चे कलम 6(b), शिक्षेसाठी कलम 24 अन्वये कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणाचे फिर्यादी पोलीस शिपाई शंकर बाळासाहेब निंबाळकर, ब.नं. 2865 आहेत.

सदर विशेष मोहिमेमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. विलास मोरे, महिला पोलीस हवालदार रेश्मा काळे ब.नं. 2377, महिला पोलीस शिपाई वनिता कदम ब.नं. 3093, पोलीस शिपाई शंकर निंबाळकर ब.नं. 2865, पोलीस शिपाई संतोष वीरकर ब.नं. 1217 आणि महिला पोलीस शिपाई सविता पंडित ब.नं. 3048 यांनी सहभाग घेऊन शहरातील विविध भागांतील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांपासून विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होणार नाहीत याची दक्षता घेणे आणि कायद्याने निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये त्यांची विक्री रोखणे या उद्देशाने बारामती शहर पोलीस स्टेशनकडून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. COTPA कायदा देशात तंबाखूजन्य पदार्थांवर सरसकट बंदी घालत नाही; त्याऐवजी त्यांची जाहिरात, विक्री, वितरण, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, अल्पवयीनांना विक्री आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील विक्री यांचे कायदेशीर नियमन करतो.

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पानटपरी चालक, दुकानदार, चहाच्या टपऱ्या तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये तसेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड त्रिज्येच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये. संबंधित शैक्षणिक संस्थांनीही तंबाखू विक्री प्रतिबंधाबाबत आवश्यक सूचना फलक दर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनकडून शैक्षणिक संस्थांच्या परिसरावर यापुढेही लक्ष ठेवण्यात येणार असून, कायद्याचे उल्लंघन निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती अथवा विक्रेत्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

“विद्यार्थी आणि युवा पिढीचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस कायद्याने मनाई असून, या तरतुदींची बारामती शहरात प्रभावी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल.”

प्रभारी पोलिस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण