मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरालगत असलेल्या माळेगाव हद्दीतील सांगवी परिसरात बेकायदेशीर मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून हा अवैध धंदा कोणतीही भीती न बाळगता खुलेआम चालवला जात आहे.

सांगवी : गेली दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत विषारी हातभट्टी दारू पिऊन ३० पेक्षा अधिक तरुणांचा मृत्यू झाल्याने अनेक महिला विधवा होऊन संसाराच्या राख रांगोळ्या झाल्या. अवैध धंदे वाल्यांच्या विरोधात आवाज उठवल्या प्रकरणी जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त झालेल्या दांपत्याने बारामती येथे चक्री उपोषण सुरू केले आहे. सांगवी येथील अवैध हातभट्टी, मटका व जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करण्या संदर्भात १३ जानेवारी पासून प्रशासकीय भवन समोर चक्री उपोषण सुरू आहे. तर रणदिवे यांनी पोलिसांविरोधात हप्ते घेऊन अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप करत लावलेल्या फ्लेक्सने बारामती करांचे लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे, इतक्या उघडपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने माळेगाव पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा बेकायदेशीर मटका व्यवसाय मालक अहिवळे आणि तावरे नावाच्या इसमांच्या माध्यमातून चालवला जात असून सांगवी बीटमध्ये हा धंदा बिनधास्त सुरू आहे. मात्र, पोलिस यंत्रणेला याची माहिती नसावी, ही शक्यता नागरिक साफ फेटाळून लावत आहेत.स्थानिक नागरिकांमध्ये सध्या तीव्र संतापाची भावना असून, सांगवी बीटवर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी माळेगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसाठी ‘मलिदा गोळा करून देत आहेत का?’ असा थेट सवाल केला जात आहे. जर पोलिसांचे पाठबळ नसेल, तर हा मटका व्यवसाय एवढ्या आत्मविश्वासाने सुरू कसा राहतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मटका व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडत आहेत. मात्र, याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, अन्यथा जनतेचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे उडण्याची शक्यता आहे.
