मेकिंग महाराष्ट्र बारामती दि.10 – बारामती नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. आरती शेंडगे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १३ मधील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरी सुविधांच्या कामांना अखेर सुरुवात करण्यात आली आहे.

परिसरातील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ड्रेनेज लाईन दुरुस्ती, नळ कनेक्शनची आवश्यक दुरुस्ती तसेच नगरपरिषदेच्या वतीने चंद्रमणी नगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालयाच्या स्वच्छतेसंबंधीचे प्रश्न मार्गी लावण्यात आले.या कामांची पाहणी व प्रत्यक्ष अंमलबजावणी नगरसेविका सौ. आरती शेंडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.या उपक्रमामुळे चंद्रमणी नगरसह प्रभाग क्र. १३ मधील रहिवाशांना स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्याच्या दृष्टीने दिलासा मिळणार असून परिसरातील नागरिकांनी नगरसेविका आरती शेंडगे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विकासकामे पुढेही सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
