भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजयाचा ‘पंच’ लगावल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने टीम इंडियाचे कौतुक केले. विराट कोहलीने दबावाच्या स्थितीत खेळलेली सावध खेळी अन् भारताच्या अविस्मरणीय विजयाचा दाखला देत अख्तरने विविध बाबींवर प्रकाश टाकला. कठीण खेळपट्टीवर किंग कोहलीने ९५ धावांची अप्रतिम खेळी केली आणि भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. खरं तर तब्बल २० वर्षांनंतर भारताने आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले आहे. धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून भारताने क्रमवारीत अव्वल स्थान गाठले.
विराट कोहली पाच धावांनी शतकाला मुकला अन् महान सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाला गवसणी घालण्यापासून दूर राहिला. विराटने आतापर्यंत वन डेत ४८ शतके झळकावली आहेत. तर, वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक (४९) शतके झळकावणारा खेळाडू म्हणून सचिनची नोंद आहे. ‘विराट’ कौतुक करताना अख्तरने म्हटले, “विराट कोहली दबावाच्या स्थितीत चांगला खेळतो किंबहुना दबावामुळेच त्याला मोठ्या खेळीची संधी मिळते. विराटला ४९वे शतक झळकावण्याची चांगली संधी होती पण दुर्दैवाने असे झाले नाही. रोहित-गिल यांनीही चांगली सुरूवात केली. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांना विराटची साथ देता आली नाही. पण रवींद्र जडेजाने ते काम चोखपणे पार पाडले. सगळ्यांना माहिती आहे की, विराटने काय केले पण त्यासाठी राहुलने देखील दबाव झेलला हे विसरून चालणार नाही.”
