हमास आणि इस्रायलमधील युद्ध १७ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. यानंतर इस्रायल हमासवर जोरदार मिसाइल हल्ले करत आहे.
गाझावर रात्रभर आणि सोमवारी पहाटे झालेल्या इस्रायली हल्ल्यात जवळपास ७० जणांचा मृत्यू झाल्याचे गाझा पट्टीमधील दहशतवादी संघटना हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर, इस्त्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी २४ तासांत पॅलेस्टिनी भागातील सुमारे ३२० ठिकाणांवर हल्ले केले. हमास-नियंत्रित गाझा पट्टीच्या राज्य-संचालित मीडिया कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, रात्रीच्यावेळी झालेल्या इस्रायली हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १७ जणांचा उत्तर गाझामधील जबलिया येथील एका घरावर झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
